वाशिमकरांनी अनुभवले निरामय जीवनाचे योगसूत्र
योग ही निरोगी आणि आनंदी जीवनाची गुरुकिल्ली आहे. दररोज नियमित योगासन करण्याची सवय मनुष्याला केवळ रोगमुक्तच ठेवत नाही तर आनंदी राहण्यासदेखील मदत करते. योगाबद्दल लोकामंध्ये जागरूकता पसरविण्यासाठी आणि मनुष्य जीवनात योगाचे महत्व पटवून देण्यासाठी दरवर्षी विश्वात जागतिक योग दिवस साजरा केला जातो. २१ जून २०२४ हा १० वा आंतरराष्ट्रीय योग दिन होता. देशाचे लाडके पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांनी जनतेला योग दिन साजरा करण्याचे आवाहन केले होते. वाशिमकरांनी शुक्रवारी आंतरराष्ट्रीय योगदिनी अशीच योगशक्तीची किमया, सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह अनुभवला. निरामय, निरोगी जीवनाची गुरुकिल्ली असलेल्या योगासनांचा अनुभव घेतला. योग दिनानिमित्त वाशिम शहरात भारत स्वाभिमान न्यास आणि पतंजली परिवाराच्या वतीने भव्य योग शिबिर संपन्न झाले. यावेळी भाजपा वाशिम-यवतमाळ लोकसभा समन्वयक मा. श्री. राजू पाटील राजे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनीही अन्य साधकांसह सहभागी होऊन योग-प्राणायाम आणि त्याद्वारे प्राप्त होणारी मनःशांती, प्रेरणा आणि सकारात्मक ऊर्जा अनुभवली. वाशिम शहरातील मन्नासिंह चौकातील स्वागत लॉन्स मंगल कार्यालयात हे योग शिबिर अत्यंत उत्साहात पार पडले. भारत स्वाभिमान न्यास आणि पतंजली परिवाराचे वाशिम जिल्हाध्यक्ष डॉ. भगवंतराव वानखडे यांनी त्यासाठी घेतलेला पुढाकार खरोखर अभिनंदनीय आहे.
* योगाभ्यासातून निरामय जीवन
योगविद्या किंवा योगाभ्यास ही भारताने जगाला दिलेली एक मोठी देणगी आहे. योगशास्त्र समुद्रासारखे अथांग असले तरी कुठल्याही पातळीवर केलेला योगाभ्यास आणि योगसाधना निरामय जीवनासाठी फलदायी ठरते. रोजच्या जीवनात योगसाधनेचा समावेश केला, तर त्याचे अनेक दृश्य आणि अदृश्य फायदे होतात. उर्जावान व्यक्तिमत्व घडवण्यासाठी योगाभ्यासाचा दररोज सराव करायला हवा. नित्य करा योग, राहा निरोग असे त्यामुळेच म्हटले जाते.
* योगाद्वारे सर्वांगीण विकास
नियमित योगासनांच्या अभ्यासाने जीवनातील उद्दिष्ट वा ध्येय गाठण्यासाठी लागणारी एकाग्रता साध्य करता येते. सुखी, निरामय जीवन जगण्यासाठी उपयुक्त ठरतील अशा अनेक गोष्टी योगातून मिळवता येतात. योगाने मनुष्याचा विवेक विचार जागृत होऊन बुध्दी विकसीत होते तर चित्तवृत्तीत बदल होऊन नैतिकता अंगी येते. योग्य वजन, सशक्त आणि लवचिक शरीर, तजेलदार त्वचा, शांत आणि प्रसन्न मन आणि उत्तम आरोग्य यातली जी गोष्ट तुम्हाला हवी असते ती द्यायला योग समर्थ आहे. योगासनांच्या अभ्यासाने रक्तसंचार सुधारून प्राणवायूचा अधिक पुरवठा होतो. त्यामुळे स्नायूंची कार्यक्षमता व लवचिकता वाढते. याशिवाय पचन क्रिया, मज्जासंस्था व श्वसनसंस्था यांचेही कार्य सुधारते. रोगप्रतिकारशक्ती वाढते. यामुळे संपूर्ण शरिराचे आरोग्य सुदृढ व निकोप राहण्यास मदत मिळते.