ज्येष्ठ नागरिकांच्या हिताची ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’
ज्ञान, अनुभव यांचा खजिना असलेले ज्येष्ठ नागरिक हे खऱ्या अर्थाने त्या घराचा आधार असतात. वय जसजसे वाढत जाते, तसतसे शरीर थकते. उतारवयात अनेक ज्येष्ठ नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागतो. दवाखाना, औषधोपचार यावर खूप पैसे खर्च होतात. आर्थिक तारांबळ होते. जनगणना २०११ नुसार महाराष्ट्र राज्यात १० ते १२% लोकसंख्या ही ज्येष्ठ नागरिकांची आहे. यातील बरेच नागरिक हे वयाची ६५ वर्षे ओलांडलेले आणि निराधार असून, त्यांना आर्थिक अडचणींमुळे इतरांवर निर्भर राहावे लागते. ज्येष्ठ नागरिकांची अशी अवस्था रोखण्यासाठी गतिमान महायुती सरकारने १६ फेब्रुवारी २०२४ रोजी समाजातील ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ आणली आहे. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी काही अटी-शर्ती आणि नियम आहेत.
जाणून घेऊया काय आहे ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ :
महाराष्ट्रातील ६५ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या ज्येष्ठांसाठी ही योजना आहे. वाढत्या वयामुळे ज्येष्ठांना अपंगत्व येते, वेगवेगळे शारीरिक आजार उद्भवतात किंवा दैनंदिन आयुष्यातील कामेदेखील व्यवस्थितपणे पार पाडता येत नाहीत. अशा नागरिकांना राज्य शासन प्रतिमाह ३००० रुपयांची मदत करणार आहे. या योजनेमुळे त्यांना अर्थसाहाय्य मिळेल आणि सोबतच शारीरिक अपंगत्वानुसार सहाय्यक उपकरणांच्या खरेदीसाठीदेखील मदत होईल. जसे की चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक, व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नि. ब्रेस, सर्व्हाइकल कॉलर इत्यादी.
* योजनेसाठी आवश्यक पात्रता व अटी :
- लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- लाभार्थीचे वय ६५ वर्षांपेक्षा अधिक असावे.
- लाभार्थीचे स्वतःचे आधार कार्ड लिंक असलेले बँक खाते असावे.
- लाभार्थीचे वार्षिक उत्पन्न २ लाखांपेक्षा कमी असावे.
* अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
- आधार कार्ड
- मतदान कार्ड
- राष्ट्रीयीकृत बँकेचे बँक पासबुक
- पासपोर्ट आकाराचे २ फोटो
- स्वयं घोषणापत्र
- शासनाने विहित केलेली अन्य कागदपत्रे
* अर्ज कसा करावा? :
- योजनेत अर्ज करण्यासाठी ‘मुख्यमंत्री वयोश्री योजने’च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- त्यानंतर वयोश्री योजना रजिस्ट्रेशन महाराष्ट्र यावर क्लिक करा.
- समोर योजनेचा अर्ज दिसेल.
- त्या अर्जामध्ये दिलेली माहिती भरा. जसे की नाव, पत्ता, वय इत्यादी.
- त्यानंतर बँकेची माहिती भरून कागदपत्रे अपलोड करा.
- योजनेसाठी अर्ज सबमिट करा.
याव्यतिरिक्त जवळच्या सेतू सुविधा केंद्रात अथवा समाजकल्याण कार्यालयात जाऊन ऑफलाईन पद्धतीनेदेखील योजनेसाठी अर्ज सादर करता येतो.