आधुनिक तंत्रज्ञान, सर्वोत्कृष्ट अभियांत्रिकीचे एकमेव प्रतीक… महाकाय अटल सेतू !

विशाल अरबी समुद्रावर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (MMRDA) बांधण्यात आलेला अटलबिहारी वाजपेयी शिवडी न्हावाशेवा सेतू म्हणजेच ‘अटल सेतू’…! या सेतूचे काम पूर्ण झाले असून, वाहतूक सेवेसाठी हा सेतू पूर्णपणे सज्ज आहे. २०१८ साली प्रत्यक्ष काम सुरु होऊन सुमारे ५ वर्षांच्या कालावधीत बनविलेल्या या सेतूचे लोकार्पण देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते १२ जानेवारी २०२४ रोजी झाले. मुंबई बंदर व जवाहरलाल नेहरू पोर्ट या दोन प्रसिद्ध बंदरांना जोडणारा हा भारतातील सर्वात मोठा, तर जगातील १० व्या क्रमांकाचा सागरी सेतू ठरला आहे.

* अटल सेतूची वैशिष्ट्ये

तब्बल १८ हजार कोटी रुपये खर्च करून बनविलेल्या या महाकाय सागरी प्रकल्पामुळे मुंबई आणि नवी मुंबई ही दोन शहरे अगदी जवळ आली आहेत. मुंबई, रायगड, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग तसेच मुंबई ते गोवा महामार्ग यांच्यातील अंतर सुमारे १५ किलोमीटरने कमी झाले आहे. देशातील सर्वाधिक २२ किलोमीटर लांबीचा समुद्री मार्गावरील हा अटल सेतू असून, त्याचा १६.५० किलोमीटर भाग समुद्रात तर उर्वरित ५.५० किलोमीटर भाग हा जमिनीवर आहे. हा सेतू म्हणजे अतिजलद, अतिमहत्वाचा आणि स्थापत्य अभियांत्रिकीचे एक उत्कृष्ट आणि आदर्श प्रतीक आहे. या सेतूच्या निर्मितीसाठी ५०० बोईंग विमाने आणि १७ आयफेल टॉवर एवढ्या वजनाचे लोखंड आणि ८४ हजार टन ७० स्टील डेकचा वापर करण्यात आला आहे. अटल सेतू नवी मुंबई, रायगडसह इतर शहरांना जोडतो. हा मार्ग शिवडी येथून सुरू होऊन समुद्रमार्गे चिर्ले येथील न्हावाशेवा या मार्गांना जोडला जातो. या मार्गावर वाहनांसाठी २५० रुपये एकेरी टोल आकारला जाईल. अटल सेतूचे निर्माणकार्य पर्यावरणाचा समतोल साधत करण्यात आले आहे. समुद्राच्या परिसरात वावरणाऱ्या पक्ष्यांना वाहनांचा आवाज आणि प्रदूषणाचा त्रास होऊ नये याची येथे पुरेपूर काळजी घेण्यात आली आहे. या समतोलामुळे शिवडी परिसरात फ्लेमिंगो पक्ष्यांची संख्या वाढली आहे.

* अटल सेतूमुळे उपलब्ध सुविधा

हा मार्ग मुंबई ते गोवा महामार्ग, वसई-विरार, नवी मुंबई, रायगड जिल्ह्यांना जोडलेला असल्याने विविध मोठे विकासात्मक प्रकल्प, उद्योग, नवी मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणात येतील. अटल सेतूमुळे मुंबई महानगर क्षेत्राचा सर्वांगीण विकास होईल. सेतूमुळे वेगवान प्रगतीचे उद्दिष्ट साध्य होणार आहे. या सेतूमुळे मुंबई ते नवी मुंबईमधील २ तासांचे अंतर आता अवघ्या २० मिनिटांत पार करणे शक्य झाले आहे. त्यामुळे आता मुंबईकरांना मोठा दिलासा प्राप्त झाला आहे. मुंबईहून पुणे, कोकण, पश्चिम महाराष्ट्राच्या दिशेने वेगवान पर्याय अटल सेतूच्या माध्यमातून प्राप्त झाला आहे. समुद्रातून उगवत्या आणि मावळत्या सूर्याचे विलोभनीय दृश्यदेखील या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना बघायला मिळेल. भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या विकासकामांचे प्रतीक म्हणून ‘अटल सेतू’ भारतात उभा आहे. मुंबईचा हा अटल सेतू हजारो हातांनी उभारलेल्या मजबूत महाकाय आणि अद्वितीय निर्माणकार्याची साक्ष नव्या पिढीला देत राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Contact us

Give us a call or fill in the form below and we'll contact you. We endeavor to answer all inquiries within 24 hours on business days.          
[contact-form-7 id="5208"]