देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान : श्रीक्षेत्र पोहरादेवी
वाशिम जिल्ह्यात मानोरा तालुक्यातील श्रीक्षेत्र पोहरादेवी हे ठिकाण बंजारा समाज बांधवांची काशी म्हणून प्रसिद्ध आहे. पोहरादेवी येथे संत श्री सेवालाल महाराज यांचे समाधीस्थळ आहे. संत श्री सेवालाल महाराज हे बंजारा समाजाचे आराध्य दैवत आहेत. त्याशिवाय या ठिकाणी संत बाबूलाल महाराजांचे समाधीस्थळ सुद्धा आहे.
सेवालाल महाराज समाधी –
प्रामुख्याने महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात पसरलेल्या बंजारा समाजातील अवतारी पुरुष संत श्री सेवालाल महाराज यांची समाधी पोहरादेवी येथे आहे. कर्नाटकमधील गुत्तीबल्लारी या गावात १५ फेब्रुवारी १७३९ रोजी सेवालाल महाराजांचा जन्म झाला.
समाज प्रबोधन करत करत सेवालाल महाराज पोहरादेवी येथे आले आणि इथेच त्यांनी समाधी घेतली. येथे संत श्री सेवालाल महाराजांचे भव्य मंदिरही उभारण्यात आले आहे. बंजारा समाजाचे अराध्य असलेल्या आई जगदंबेचे प्राचीन मंदिर याच ठिकाणी आहे. संत रामराव महाराज यांची कुटी आणि त्यांच्या पाठीमागे त्यांचे समाधीस्थळ आहे. बाबनलाल महाराज मंदिरासह इतर पीठेसुद्धा या परिसरात आहेत.
डॉ. रामराव महाराज –
संत श्री सेवालाल महाराजांच्या वंशातील परशराम महाराज यांनी पोहरादेवी येथे राम जन्मोत्सव सोहळ्याला सुरुवात केली. विसाव्या शतकात पोहरादेवी संस्थान आणि बंजारा समाजाला नवी दिशा देण्यात डॉ. रामराव महाराज यांनी मोठे कार्य केले. डॉ. रामराव महाराज यांना वयाच्या १३व्या वर्षी पोहरादेवीच्या गादीवर बसविण्यात आले. सुरुवातीची १२ वर्षे अग्नी अनुष्ठान आणि पुढील १२ वर्षे मौनव्रत धारण केल्यानंतर समाज जागृतीसाठी त्यांनी देशभर भ्रमण केले. त्यांच्या शिष्य परिवारात समाजाच्या सर्वच घटकांतील लोकांचा समावेश होता. रामराव महाराज यांच्याच काळात पोहरादेवीला पूर्वीच्या तुलनेत अधिक महत्त्व प्राप्त झाले.
साजरे होणारे उत्सव –
पोहरादेवी येथे अश्विन नवरात्र, चैत्री नवरात्र हे दोन्ही उत्सव साजरे होतात. चैत्री नवरात्रात या ठिकाणी संपूर्ण देशभरातील भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. राम नवमीच्या दिवशी रामजन्मोत्सव मोठा सोहळा असतो. या शिवाय गुरुपौर्णिमा, दिवाळी, संत सेवालाल महाराज यांची जयंतीसुद्धा येथे साजरी केली जाते.
पोहरादेवीचं महत्व –
पोहोरादेवी हे एक धार्मिक स्थळ आहे. संपूर्ण देशभरातील भाविक श्रीराम नवमी यात्रेकरिता या ठिकाणी येतात. संत श्री सेवालाल महाराजांच्या समाधीस्थळी येऊन नतमस्तक होतात. या ठिकाणी दर्शन घेतात. नवस फेडतात.