लाडका भाऊ नव्हे, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना
महाराष्ट्रातील महायुतीचे सरकार समाज घटकांच्या विकासासाठी शर्थीचे प्रयत्न करीत असताना, विरोधक मात्र काही योजनांचा विपर्यास करून जनतेमध्ये दिशाभूल पसरविण्याचे काम करीत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. अजित पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची घोषणा केली होती. या योजनेद्वारे युवकांना स्टायपेंड (रोजगार भत्ता) म्हणून राज्य सरकारतर्फे ६ ते १० हजार रुपये देण्याची घोषणा केलेली आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागातर्फे ही योजना राबवली जाणार आहे. मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे यांनी या योजनेची माहिती पंढरपूरमध्ये दिली होती. या योजनेविषयी सांगताना, त्यांनी लाडकी बहीण योजनेप्रमाणे लाडक्या भावांसाठीही योजना आणल्याचे म्हटले होते. लाडका भाऊ योजना अशी कुठलीही योजना सरकारने आणलेली नसून ती मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आहे.
* काय आहे ही योजना?
राज्यातील युवकांना शिक्षण पूर्ण झाल्यानंतर उद्योजकांकडे प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षणाद्वारे रोजगारक्षम करणे, हा यामागे सरकारचा प्रमुख उद्देश आहे. राज्य सरकारकडून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेकरिता ५५०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
* योजनेचे स्वरूप
उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षणाद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची अंमलबजावणी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य यांच्याकडून करण्यात येणार आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या या योजनेचे ६ हजार रुपये बारावी उत्तीर्ण असणाऱ्यांना सरसकट दिले जाणार नाहीत. शासन निर्णयातील अटीनुसार ज्यांचे शिक्षण चालू नाही तेच यासाठी अर्ज करू शकतात.
* एकदाच मिळेल योजनेचा लाभ
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेनुसार बारावी पास असलेल्या युवकाने अर्ज केल्यास ६ हजार रुपये दिले जातील. एखाद्या युवकाने पुढे जाऊन पदवी पूर्ण केल्यास त्याला पुन्हा या योजनेचा लाभ घेता येईल का, असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. तेव्हा योजनेचा लाभ दुसऱ्यांदा मिळणार नाही. एका युवकाला या योजनेचा लाभ एकदाच मिळणार आहे.
* अर्ज कुठे करायचा?
बारावी, आय.टी.आय., पदविका, पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करू शकतील. विविध क्षेत्रातील मोठे प्रकल्प, उद्योग/स्टार्टअप्स, विविध आस्थापना इ. यांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदवतील. यानंतर अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना प्रशिक्षणाची संधी दिली जाईल.
* कशी मिळणार स्टायपेंडची रक्कम?
या योजनेच्या माध्यमातून सुमारे १० लाख कार्य प्रशिक्षण संधी प्रत्येक आर्थिक वर्षात उपलब्ध होतील. कार्य प्रशिक्षणाचा कालावधी ६ महिने असेल व या कालावधीसाठी उमेदवारांना शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येईल. विद्यावेतन लाभार्थ्याच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येईल.
* काय आहेत पात्रतेच्या अटी?
उमेदवाराचे किमान वय १८ व कमाल ३५ वर्षे असावे. बारावी पास/आयटीआय/पदविका/पदवीधर/पदव्युत्तर असणाऱ्या युवकाला योजनेसाठी अर्ज करता येईल. उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा. त्याने आधार नोंदणी केलेली असावी आणि उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे. उमेदवाराने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी.