फक्त १ रुपयात पिकांना द्या विम्याचे संरक्षण ! । प्रधानमंत्री पीक विमा योजना ।
शेतकरी बंधूंनो, पाऊसमान कमी-जास्त झाले तर किंवा पिकांवर अचानक रोगराई, किडीचे संकट आले तर हाताशी आलेले पीक मातीमोल ठरते. शेतीवर केलेला खर्च, मेहनत सगळी व्यर्थ जाते. अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, दुष्काळ, गारपीट यांसारखी अस्मानी संकटे शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न उभा करतात. आता करायचे काय आणि पुढच्या शेतीकामासाठी पैसा कसा उभा करायचा, या चिंतेत शेतकरी वर्ग आणखी खचून जातो. देशाचे लाडके पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांनी शेतकरी बांधवांच्या हालअपेष्टा ओळखून ‘प्रधानमंत्री पीक विमा योजना’ सुरू केली आहे. याअंतर्गत आता कोणतेही भयानक संकट येउद्या, तुमच्याकडे पीक विम्याचे सुरक्षा कवच असेल. फक्त एक रुपयात तुमच्या पिकांचा विमा करणारी ही योजना समस्त शेतकरी बांधवांसाठी लाभकारक आहे. आज येथे जाणून घेऊया प्रधानमंत्री पीक विमा योजनेची सविस्तर माहिती –
देशाचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्यांदा राजकारभाराची सूत्रे सांभाळणाऱ्या केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार खरीप हंगाम २०२३ – २०२४, रब्बी हंगाम २०२५ – २०२६ साठी सर्वसमावेशक पीक विमा योजना राबविण्यास मान्यता दिली आहे. दि. २६ जून २०२३ च्या शासन निर्णयानुसार या योजनेत विमा कंपनी १ वर्षात जिल्हा समूहामध्ये एकूण विमा हप्ता रकमेच्या ११० टक्क्यांपर्यंतचे दायित्व स्वीकारेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना केवळ प्रति अर्ज १ रुपया भरावा लागतो. याव्यतिरिक्त इतर कोणतेही CSC शुल्क आकारले जात नाही. १५ जुलै २०२४ पर्यंत या योजनेसाठी शेतकऱ्यांना अर्ज करता येऊ शकतो. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या पीक विमा योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. तेव्हा आलेली संधी सोडू नका, आजच तुमचे पीक विमा योजनेद्वारे संरक्षित करा.
* प्रधानमंत्री पीक विमा योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये
– प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी आतापर्यंतचा हा सर्वात कमी हप्ता आहे.
– साधारणतः विमा योजनेचा हप्ता हा १५ टक्क्यांपर्यंत असतो.
– पीक विमा योजनेच्या कठोर अंमलबजावणीत कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर.
– पीक नुकसानीची पाहणी करण्यासाठी ड्रोन, मोबाईल, गुगल मॅपिंग अशा आधुनिक तंत्रांचा वापर.
– पीक विमा केवळ उत्पन्नातील घट एवढ्यापुरताच मर्यादित नसून, पिकांचे नुकसान, चक्रीवादळ, भूस्खलन, अवकाळी पाऊस यांसारख्या नैसर्गिक आपत्तीही यात समाविष्ट आहेत.
– पंतप्रधानांच्या ‘एक राष्ट्र, एक योजना’ या उद्देशाने ही योजना संपूर्ण देशात राबविण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.
* कोणते शेतकरी पात्र ठरतात?
– या योजनेचा लाभ घेण्यासाठी कर्जदार, बिगर कर्जदार, भाडेपट्टीवर शेती करणारे इत्यादी सर्व शेतकरी अर्ज करू शकतात.
* प्रधानमंत्री पीक विमा योजनेची उद्दिष्टे
– नैसर्गिक आणि अनपेक्षित घटनांमुळे होणारे नुकसान सहन करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक साहाय्य प्रदान करणे, हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
– शेतकऱ्यांना आर्थिक मदत प्रदान करणे.
– कृषी क्षेत्रातील शाश्वत उत्पादनाला साहाय्य करणे.
– कृषी क्षेत्रातील अद्यावत आणि आधुनिक पद्धतींचा अवलंब करण्यास प्रोत्साहित करणे.
– नैसर्गिक आपत्ती, कीडरोग यांमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे.
– कृषी क्षेत्राला पतपुरवठा करत राहणे.
* योजनेसाठी अर्ज कसा करावा ?
– प्रधानमंत्री पीक विमा योजनेबद्दल सविस्तर माहितीसाठी pmfby.maharashtra@hdfcergo.com या संकेतस्थळावर भेट देऊ शकता.
– तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा
– तुमच्या गावातील जवळचे नागरी सुविधा केंद्र
– जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी तसेच क्षेत्रीय स्तरावरील संबंधित कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधू शकता.