मोदी की गॅरंटी : अर्थव्यवस्थेची शानदार वाटचाल
देशवासीयांचे लाडके, कणखर नेतृत्व पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाचे सरकार दमदार कामगिरी करीत असल्याने, भारतीयांचा विश्वास संपादन करण्यात भाजप नेतृत्व यशस्वी झाले आहे. दरम्यानच्या काळात पंतप्रधान मोदी यांनी अनेकदा देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या भूमिकेवर जोर दिला आहे. गेल्या काही वर्षात झालेल्या आर्थिक सुधारणा, पायाभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. त्यांनी देशाची सूत्रे हाती घेतली तेव्हा भारताची अर्थव्यवस्था मंदावलेली होती. भ्रष्टाचार प्रकरणांमुळे गुंतवणूकदारांचा अर्थव्यवस्थेवरील विश्वास कमी होत चालला होता. परंतु गेल्या दशकात भारताच्या सकल देशांतर्गत दरडोई उत्पादनात (GDP) लक्षणीय वाढ झाली आहे.
* अर्थव्यवस्था वाढीचा दर
देशाच्या सांख्यिकी मंत्रालयाने नुकतेच जाहीर केल्यानुसार, देशांतर्गत उत्पादनाने (GDP) जानेवारी ते मार्च या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत ७.८ टक्क्यांची वाढ दर्शविली आहे. यात उल्लेखनीय म्हणजे दुसऱ्या एका अंदाजानुसार, २०२३-२४ या संपूर्ण वर्षाचा GDP मात्र मागील वर्षातील ७.६ टक्क्यांच्या तुलनेत ८.२ टक्क्यांपर्यंत सुधारला आहे. याआधीच्या म्हणजे २०२२-२३ या संपूर्ण आर्थिक वर्षात भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर ७ टक्के होता. सरलेल्या आर्थिक वर्षात आधीच्या तिन्ही तिमाहीत विकासदर ८ टक्क्यांहून अधिक राहिला आहे. ऑक्टोबर-डिसेंबर २०२३ तिमाहीत तो ८.६ टक्के, त्याआधीच्या जुलै-सप्टेंबर २०२३ तिमाहीत ८.१ टक्के, तर एप्रिल ते जून २०२३ तिमाहीत तो ८.२ टक्के असा होता. आता जानेवारी-मार्च अंतिम तिमाहीत ७.८ टक्के नोंदवला गेला आहे.
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने फेब्रुवारीमध्ये जाहीर केलेल्या पहिल्या अंदाजात, २०२३-२४ साठी GDP वाढीचे अनुमान ७.७ टक्के होते. नव्याने जाहीर आकडेवारीनुसार, वास्तविक जीडीपी, २०२३-२४ मध्ये १७८.८२ लाख कोटी रुपयांची पातळी गाठण्याचा अंदाज आहे. पहिल्या सुधारित अंदाजात हा आकडा १६०.७१ लाख कोटी रुपये होता. नाममात्र GDP किंवा सध्याच्या किमतींनुसार GDP २०२३-२४ मध्ये २९५.३६ लाख कोटी रुपयांची पातळी गाठेल, असा अंदाज आहे. २०२२-२३ मधील २६९.५० लाख कोटी रुपयांच्या तुलनेत त्यात ९.६ टक्के वाढ दर्शविली जाईल, असे नमूद केले आहे.
* उत्पादन क्षेत्राची सरस कामगिरी
वास्तविक सकल मूल्यवर्धन (GVA) आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये ७.२ टक्क्यांनी वाढले आहे. मुख्यत: उत्पादन क्षेत्राच्या चांगल्या कामगिरीमुळे हे शक्य झाले आहे. निर्मिती क्षेत्राचे सकल मूल्यवर्धन २०२२-२३ मध्ये २.२ टक्क्यांनी गडगडले होते. त्या तुलनेत २०२३-२४ मध्ये ९.९ टक्क्यांनी वाढले आहे. जानेवारी ते मार्च २०२४ तिमाहीत उत्पादन क्षेत्रातील सकल मूल्यवर्धन ८.९ टक्क्यांपर्यंत वाढले आहे, जे वर्षापूर्वी ०.९ टक्क्यांवर होते. खाण आणि उत्खनन क्षेत्रातही मागील वर्षातील १.९ टक्क्यांच्या तुलनेत सरलेल्या आर्थिक वर्षात ७.१ टक्के दराने सकल मूल्यवर्धन दिसून आले.
* पाच ट्रिलियन डॉलरचे लक्ष्य समीप
वार्षिक ८.२ टक्क्यांच्या लक्षणीय वाढीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार आता ३.५ ट्रिलियन (लाख कोटी) डॉलरपर्यंत गेला आहे. ५ ट्रिलियन डॉलरचे लक्ष्य गाठण्याचा टप्पा हा आता पुढील काही वर्षांच्या अंतरावर आहे. येत्या काही वर्षात देशाची अर्थव्यवस्था नवे उच्चांक प्रस्थापित करण्याची शक्यता आहे.