जाणून घ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखे आहेत कशी?
हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची कारकीर्द आपणा सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. रयतेच्या या राजाने तत्कालीन शत्रूंशी अनेक युद्धे केली आणि ती जिंकली. या सर्व लढायांमध्ये वापरलेली शस्त्रात्रे याचि देही याचि डोळा पाहणे, हाही आपल्यासाठी एक अमृतयोगच ठरतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतापगडावरील पराक्रमाची निशाणी असणारी वाघनखे आता आपल्या महाराष्ट्रात आली आहेत. लंडनहून आणलेली ही वाघनखे साताऱ्याच्या वस्तुसंग्रहालयात ठेवण्यात आली आहेत. राज्याचे मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे आणि मा. उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, श्री. अजितजी पवार यांच्या उपस्थितीत हा भव्य लोकार्पण सोहळा पार पडला.
* कशी असतात वाघनखे?
वाघनखे ही धातूची असतात. एका पट्टीवर पुढे चार वाघाच्या नखांप्रमाणे वळलेली धातूची अणुकुचीदार नखे बसवलेली असतात आणि दोन बाजूंना ती बोटात घालण्यासाठी दोन पोकळ्या असतात. ती हातात लपवून त्याद्वारे अगदी जवळ असलेल्या शत्रूला मारायला ती वापरली जात असत. छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनखांच्या मदतीने अफजलखानाला मारले होते.
* वाघनखांविषयी माहिती
* घटक : पोलाद, चामडे व रेशीम
* मोजमाप : लांबी ८.६ सेंमी, खोली ९.५ सेंमी, पट्टीची लांबी ७.५ सेंमी, अंगठ्याचा व्यास २.५ सेंमी (मोठी), २.३ सेंमी (लहान)
* एकूण वजन : ४९ ग्रॅम
* नखातील अंतर (मोठी अंगठी ते लहान अंगठी) १.८ सेंमी, १.८ सेंमी, १.५ सेंमी
* छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर केलेल्या शौर्याचे प्रतीक असलेली ही वाघनखे साताऱ्यात विशेष सुरक्षेत दाखल झाली.
* ही वाघनखे येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयातील सुरक्षा पेटीत ठेवण्यात आली आहेत.
* या वाघनखांच्या सुरक्षिततेसाठी बुलेटप्रूफ काचपेटी, तसेच मेटल डिटेक्टर, सीसीटीव्ही कॅमेरे, लेसर सेंसर आदी यंत्रणा लावण्यात आल्या आहेत.
* पोलीस व बाहेरच्या सुरक्षा यंत्रणेकडे सुरक्षिततेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
* ऐतिहासिक वाघनखे लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममधून तीन वर्षांसाठी भारतात आणली आहेत.
* ही वाघनखे विशेष विमानाने मुंबईत दाखल झाल्यानंतर सातारा पोलीस व पुरातत्त्व विभागाच्या माध्यमातून साताऱ्यात आणण्यात आली.
* वाघनखांसोबत ब्रिटनच्या म्युझियममधील एक केअर टेकर आला असून, तो वाघनखांची सर्व ती काळजी घेणार आहे.