जनसामान्यांच्या हिताची प्रधानमंत्री सूर्योदय योजना
भारतवासीयांच्या दैनंदिन जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी केंद्र सरकार निरंतर प्रयत्नशील आहे. याअनुषंगाने देशाचे लाडके पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांनी जनकल्याणासाठी अनेक योजना राबवल्या आहेत. अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर पंतप्रधान श्री. मोदी यांनी हरित ऊर्जेच्या दिशेने पाऊल टाकले. देशभरातील १ कोटी घरांना सौरऊर्जेच्या माध्यमातून मोफत वीज देण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. त्यासाठी त्यांनी ‘प्रधानमंत्री सूर्योदय योजना’ अंमलात आणली. या योजनेची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
* काय आहे प्रधानमंत्री सूर्योदय योजना?
‘प्रधानमंत्री सूर्योदय योजने’अंतर्गत १ कोटी अल्प किंवा मध्यम उत्पन्न असणाऱ्या कुटुंबांच्या घराच्या छतावर सौर पॅनल बसविले जातील. यामुळे पारंपरिक विजेचा वापर तर कमी होईलच, सोबत वीज जोडणी करण्यापासून ते वीज बिल भरण्यापर्यंत येणाऱ्या सर्व अडचणींपासूनही लोकांना दिलासा मिळेल. या योजनेमार्फत देशातील १ कोटी घरांना दरमहा ३०० युनिटपर्यंत मोफत वीज मिळेल. सौर पॅनल बसविण्यासाठी शासनाकडून अनुदानही दिले जाईल. १ किलोवॅट सौर पॅनलसाठी ३० हजार रुपये तर २ किलोवॅट सौर पॅनलसाठी ६० हजार रुपये आणि ३ किलोवॅट सौर पॅनलसाठी ७८ हजार रुपये इतके अनुदान शासनाकडून दिले जाईल.
* या योजनेत नोंदणी कशी करायची?
‘प्रधानमंत्री सूर्योदय योजने’अंतर्गत देशातील अधिकाधिक लोकांनी नोंदणी करावी यासाठी सरकार प्रयत्नरत आहे. योजनेसाठी पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून नोंदणी करता येईल. तसेच पोस्टमनचीही मदत या योजनेच्या नोंदीसाठी घेता येऊ शकते. आपल्या गावातील किंवा जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन यासाठी अर्ज करता येईल.
* योजनेचा लाभ कसा घ्यायचा?
- शासनाची अधिकृत वेबसाईट https://solarrooftop.gov.in येथे आपणास भेट द्यावी लागेल.
- यानंतर Apply for Rooftop Solar वर जा.
- नोंदणी करताच तुमचे नवीन खाते तयार होईल.
- यादरम्यान तुम्हाला तुमचा वीज ग्राहक क्रमांक, मोबाईल नंबर आणि E-mail id इत्यादी माहितीसुद्धा भरावी लागेल.
- यानंतर तुम्हाला तुमच्या परिसरातील नोंदणीकृत विक्रेत्यांची यादी मिळेल.
- मिळालेल्या यादीमधून एक विक्रेता तुम्ही निवडू शकता.
- विक्रेता निवडल्यानंतर तुमचा अर्ज मंजुरीसाठी डीस्मॉककडे पोहचेल.
- डीस्मॉककडून मंजुरी मिळताच तुम्ही सोलार प्लांट बसवू शकता.
- सोलार प्लांट बसवताच त्याचा तपशील तुम्हाला योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर सबमिट करावा लागेल.
- यानंतर तुम्हाला नेट मीटरसाठी अर्ज करावा लागेल.
- अंतिम टप्प्यात पोर्टलद्वारे बँक खात्याचा तपशील आणि कॅन्सल्ड चेक सबमिट करावा लागेल.
* योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- उत्पन्नाचा पुरावा
- पत्त्याचा पुरावा
- शिधापत्रिका
- वीज बिल
- बँक खाते तपशील
- पासपोर्ट साईज फोटो
प्रधानमंत्री सूर्योदय योजनेद्वारे अखंडित मिळणाऱ्या सौरऊर्जेचा वापर करून तुम्हीही आपल्या घरातील वीज बिलाचा मोठा खर्च या योजनेद्वारे वाचवू शकता.