कामगारांचे जीवनमान उंचाविणारी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना-२०२४
लघुउद्योग-व्यवसायात काम करणारा कामगार हा खऱ्या अर्थाने देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. आपल्या कुटुंबाला आधार देऊन, देशाची अर्थव्यवस्था मजबूत करणाऱ्या या कामगारांच्या जीवनात आनंदाची पेरणी करण्यासाठी, त्यांच्या कौशल्याला अत्याधुनिक प्रशिक्षण आणि तंत्रांच्या साह्याने प्रावीण्याची जोड मिळायला हवी. त्या त्या उद्योगातील आधुनिक तंत्रज्ञान, संशोधने यांच्याशी त्यांचा परिचय झाला तर त्यांच्या कार्यकुशलतेत नक्कीच भर पडेल. या माध्यमातून त्यांना अधिकचे पैसेही मिळतील आणि त्यांच्या कुटुंबाला मोठा आर्थिक आधार लाभेल. देशातील अशाच लाखो कामगारांना कौशल्य विकास, प्रशिक्षण आणि आर्थिक साहाय्य प्रदान करणारी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना-२०२४ आहे.
मागील वर्षीच्या अर्थसंकल्पात आर्थिक वर्ष २०२३-२४ ते २०२७-२८ या ५ वर्षांच्या कालावधीसाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. देशातील छोट्या व्यावसायिकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी साहाय्य करणारी ही योजना असून यामार्फत विश्वकर्मा समाजातील कुशल कामगारांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कमी व्याजदराने अर्थसाहाय्य दिले जाते. ही योजना कामगारांना कौशल्य विकास, प्रशिक्षण आणि आर्थिक मदत प्रदान करते. योजनेच्या पहिल्या टप्प्यात अठरा पारंपरिक उद्योगांचा समावेश करण्यात आलेला आहे.
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेसाठी तब्बल १७ हजार कोटी रुपये इतक्या निधीची तरतूद करण्यात आली होती. देशभरातील १४० पेक्षा अधिक जातींच्या लोकांना लाभ देणे हा या योजनेचा उद्देश होता. विश्वकर्मा समाजातील सुतार, लोहार, गवंडी, कुंभार यांसह इतर कामगारांना कमी व्याजदरात तीन लाख रुपयांपर्यंतचे अर्थसहाय्य योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येईल.
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेसाठी आवश्यक पात्रता :
- विश्वकर्मा समाजातील १४० पेक्षा अधिक जातीतील कामगार या योजनेसाठी पात्र असतील.
- अर्ज करणाऱ्या कामगाराच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरीत नसावी.
- ज्या कामगारांच्या कुटुंबातील व्यक्ती सरकारी नोकरीत नाही आणि ते आयकर भरत नाहीत असे कामगार या योजनेसाठी पात्र असतील.
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :
- लाभार्थीचे आधार कार्ड
- लाभार्थीचे बँक पासबुक
- जात प्रमाणपत्र
- उत्पन्न दाखला
- मोबाईल नंबर
- रहिवासी प्रमाणपत्र
- पासपोर्ट आकाराचा फोटो
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत :
- या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी pmvishwakarma.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- आधार क्रमांक आणि मोबाईल नंबरद्वारे नोंदणी करा.
- त्यानंतर एक OTP प्राप्त होईल.
- अर्जाचे पेज उघडल्यानंतर त्यात दिलेली सर्व माहिती लक्षपूर्वक भरा.
- यानंतर आधार कार्ड आणि इतर कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
- शेवटी `सबमिट`वर क्लिक करून अर्ज दाखल करा.