वाशिमकरांचे प्रसिद्ध ग्रामदैवत श्री बालाजी
वाशिममधील श्री बालाजी मंदिर शहरातील प्राचीन मंदिर म्हणून प्रचलित आहे. या मंदिराला भवानी काळू यांनी इसवी सन 1779 ला स्थापीत केले होते. वाशिमकरांची या मंदिराप्रती अपार श्रध्दा असून, त्यांच्या मान्यतेनुसार तिरूपतीचा बालाजी पेरणी झाली की, येथे विश्राम करायला येतो. हे वाशिमकरांचे ग्रामदैवत आहे.
मंदिरात प्रवेश करताच भगवान श्री बालाजींची मूर्ती लक्ष वेधून घेते. काळ्या पाषाणातली अतिशय रेखीव आणि कोरीव मूर्तीचे चैतन्य कितीतरी वेळ आपण पाहात राहावे असेच आहे. मूर्तीच्या तेजावरून प्रथम पाहणाऱ्याची नजर हटता हटत नाही.
श्री बालाजींची मूर्ती एका पाषाणात साकारली असून, मूर्ती अत्यंत रेखीव आहे. दागदागिन्यांनी मूर्ती ची शोभा आणखीनच वाढते. येथील भगवान बालाजींची ख्याती दुरवर असल्याने देशभरातून असंख्य भाविक येथे दर्शनाकरिता येत असतात. मंदिर परिसरात गणेशाचे आणि हनुमंताचे देखील मंदिर आहे.
एरवी अत्यंत शांत असणारा हा परिसर उत्सवाच्या दरम्यान मात्र मोठया प्रमाणात गजबजलेला असतो. अश्विन महिन्यात भगवान बालाजीचा उत्सव या ठिकाणी मोठया उत्साहात साजरा होत असतो आणि फार दुरवरून त्यावेळेस भाविक दर्शनाचा लाभ घेण्याकरिता येथे येतात.
काही वर्षांपूर्वी मंदिराच्या आतील गाभाऱ्यात एक आश्चर्यकारक सोन्याचा मुलामा असलेला घुमट जोडला गेला. मुख्य बालाजी मंदिराच्या दोन्ही बाजूला २ इतर मंदिरे आहेत, ज्यामध्ये व्यंकटेश्वर बालाजीला समर्पित आणि दुसरे रामाला. नंतरच्या मंदिरात श्रीराम, लक्ष्मण, सीता, हनुमान आणि राधा-कृष्णाच्या प्रतिमा आहेत. रामनवमीचा उत्सव येथे दरवर्षी साजरा केला जातो.