महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ भाजपा महायुतीचा महाविजय

नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष व मित्रपक्षांच्या महायुतीने महाराष्ट्राच्या रणमैदानावर मोठा दिग्विजय मिळवून विरोधी महाविकास आघाडीचे पानिपत केले आहे. महाराष्ट्रातील समस्त जनतेने महायुतीला दिलेला हा महाआशीर्वाद म्हणावा लागतो. आताच काही महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणूक झाली. त्यात भाजपाने अब की बार चारसौ पार असा नारा दिला होता. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने अब की बार दो सौ पार जागा मिळवून हा नारा एका अर्थाने खरा करून दाखवला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपा महायुतीने दोनशेचा टप्पा ओलांडला. विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्याच्या आदल्या दिवशी एक्झिट पोलने व्यक्त केलेला अंदाजही चुकीचा ठरला आणि भाजपा महायुतीचा विजयरथ विरोधकांच्या चिंधड्या उडवून पुढे पुढे जात राहिला. भाजपच्या कोणत्याही मोठ्या किंवा स्थानिक नेत्याने, निवडणूक विश्लेषकांनी किंवा मीडियाच्या दिग्गजांनी भाजपा महायुतीच्या एवढ्या मोठ्या विजयाची भविष्यवाणी केली नव्हती. महाराष्ट्र विधानसभेच्या आखाड्यात महायुतीने २८८ जागांपैकी २३१ जागा जिंकल्या आहेत. यात एकट्या भाजपाने १३२ जागांवर विजय मिळवून विरोधकांना पार धुळीस मिळवले आहे. मा. श्री. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाने ५७ जागा जिंकल्या आहेत. मा. श्री. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ४१ जागांवर विजय मिळवला आहे. महाराष्ट्र विधानसभेत पुढील पाच वर्षे विरोधी पक्षनेताही नसेल, अशी अभूतपूर्व स्थिती या महाविजयाने करून ठेवली आहे. भाजपा महायुतीच्या विरोधात लढलेल्या महाविकास आघाडीला संपूर्णपणे केवळ ५० जागा मिळाल्या. महाविकास आघाडीत तीन प्रमुख पक्ष काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) हे आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी रणांगणात उतरलेल्या दोन्ही आघाड्यांना विजयाची समसमान संधी असेल, असे बहुतेकांचे म्हणणे होते, पण जे झाले ते एखाद्या सुनामीप्रमाणे झाले. भाजपा महायुतीच्या लाटेत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. निकालापूर्वी आलेल्या एक्झिट पोलने महायुतीला पूर्ण बहुमत मिळेल असे भाकीत केले होते, परंतु प्रत्यक्षात निकाल अत्यंत अनपेक्षित असा होता. विजयाचा हा आकडा बहुमतापेक्षा खूपच अधिक होता. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या सात दशकांत कोणत्याही निवडणुकीत एवढा मोठा विजय कोणत्याही पक्षाला मिळालेला नाही, असे आता सर्वत्र मानले जात आहे. भाजपा महायुतीच्या विजयामागे एकतेची शक्ती आहे. संपूर्ण निवडणुकीत भाजपा महायुतीचे प्रमुख नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्रितपणे, एकदिलाने लढले.

महायुतीच्या कल्याणकारी योजना यशस्वी

महाराष्ट्राच्या गतिमान महायुती सरकारने महिलांसाठी सुरू केलेली लाडकी बहीण योजना खूपच यशस्वी ठरली. महिलांच्या संसार खर्चाला हातभार लागावा आणि महिलांचे आर्थिक सक्षमीकरण व्हावे, या हेतूने सुरु केलेली ही सर्वात लोकप्रिय योजना ठरली. याअंतर्गत महिलांना त्यांच्या बँक खात्यावर दर महिन्याला १५०० रुपये मिळत होते. रक्षाबंधन सणाच्या मुहूर्तावर सुरू झालेली लाडकी बहीण योजना भावाने बहिणीला दिलेली ओवाळणी होती. या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सर्व माता-भगिनींनी महायुतीच्या बाजूने आपला कौल दिला. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील महिलांना घरबसल्या दरमहा १५०० रुपये या योजनेतून दिले गेले. आता नव्या महायुती सरकारात दरमहा २१०० रु. लाडक्या बहिणींना मिळणार आहेत. याशिवाय समाजहिताच्या दृष्टीने महायुती सरकारने अनेक कल्याणकारी योजना राबवल्या. त्यामुळे शेतकरी, महिला व युवकांनी भाजपा महायुतीला भरभरून मतदान केले.

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील महायुतीने अभूतपूर्व विजय मिळवला आहे. या निवडणुकीद्वारे महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाचा एक नवा अध्याय सुरु झाला आहे. भाजपा महायुतीने या निवडणुकीत संघटनात्मक शक्तीचे जोरदार प्रदर्शन केले. भाजप आणि महायुतीमधील घटक पक्षांनी स्थानिक स्तरावरून राष्ट्रीय स्तरापर्यंत एकात्मता साधली. पक्षाने बूथ स्तरावर मजबूत संघटना उभी करून थेट मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर दिला. या निवडणुकीदरम्यान प्रभावी प्रचार मोहीम राबविण्यात आली. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी, कणखर गृहमंत्री मा. श्री. अमितजी शाह, राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस, मा. श्री. अजितदादा पवार व अन्य वरिष्ठ नेत्यांनी राज्यभर व्यापक प्रचार केला. मोठ्या जाहीर सभांबरोबरच डिजिटल प्रचारावरही भर देण्यात आला. त्यामुळे तरुण मतदारांचा मोठा वर्ग आकर्षित करण्यात यश मिळाले. महायुतीच्या नेते व पदाधिकाऱ्यांनी विविध समाजघटकांशी संवाद साधून आपली भूमिका मांडली. जनतेचा विश्वास आणखी बळकट केला. महायुतीने विविध समाजघटकांशी जवळीक साधत त्यांच्या समस्या समजून घेतल्या. समाजाच्या विविध घटकांपर्यंत पोहचून राबवलेल्या धोरणांनी विश्वास संपादन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली केंद्र आणि राज्य सरकारने अनेक महत्वाकांक्षी प्रकल्पांची उभारणी केली आहे. महाराष्ट्राच्या गतिमान विकासासाठी महायुती सरकारच पुन्हा यायला हवे, हा मुद्दा सामान्य जनतेलाही पटला. महाराष्ट्र राज्यात उभारलेले मजबूत रस्त्यांचे महाकाय जाळे, सरकारचा विकासवादी अजेंडा, मेट्रो प्रकल्प, राष्ट्रीय महामार्ग, जलसंधारण आणि औद्योगिक क्लस्टर्स यांसारख्या प्रकल्पांवर निवडणूक प्रचारादरम्यान भर देण्यात आला. विकास हा प्रमुख निवडणूक मुद्दा ठरला, ज्यामुळे मतदारांचा भाजप महायुतीकडे कल वाढला. महायुतीचा हा विजय रथ भविष्यातही आणखी वेगाने पुढे पुढे जात राहील, असा विश्वास वाटतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Contact us

Give us a call or fill in the form below and we'll contact you. We endeavor to answer all inquiries within 24 hours on business days.          
[contact-form-7 id="5208"]