श्री.नृसिंह सरस्वतींचे जन्मस्थान कारंजा
कारंजा लाड हे महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील नगरपरिषद असलेले एक शहर आहे. या अत्यंत प्राचीन असलेल्या नगरीचे माहात्म्य स्कंदपुराणातील पातालखंडात आले आहे. करंज ऋषींवरूनच या नगरीला करंजपूर हे नाव मिळाले असे म्हणतात. करंजपूरचे कार्यरंजकपूर, आणि नंतर कारंजा झाले. या नगरीत जैन लाड समाजाची वस्ती असल्याने ‘कारंजा लाड’ असा या गावाचा उल्लेख केला जातो. कारंजा गावाजवळ अडाण नदीवर बांधलेले धरण आहे. मात्र त्याचा अधिक उपयोग यवतमाळ जिल्ह्याला होतो. तसेच या कारंजा नगरीत जैन समाज मोठया प्रमाणात आहे.
श्री दत्त भक्त संप्रदाय आणि उपासकांसाठी कारंजा शहर मोठे श्रद्धास्थान ठरले आहे. १४ व्या शतकातील महान गुरू श्री नृसिंह सरस्वतींचे जन्मस्थान म्हणून कारंजा ओळखले जाते. साठ सत्तर हजार लोकसंख्येच्या या गावी चांगली बाजारपेठ असून गुरुमंदिरामुळे दत्तभक्तांनाही ते प्रिय झाले आहे. प्राचीन काळातही या क्षेत्राचे महत्त्व वर्णन केले आहे. करंजमुनींनी या ठिकाणी पाण्यासाठी तलाव खणण्यास सुरुवात केल्याची कथा आहे. या क्षेत्रात गंगा व यमुना यांचे वास्तव्य बिंदुमती नावाच्या कुंडात असून येथून पुढे बेंबळा नदी वाहते. याच क्षेत्रात यक्षमाता यक्षिणी देवीचेही वास्तव्य असल्याचे सांगतात. विदर्भातील अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर-यवतमाळ या रेल्वेरस्त्यावर कारंजा हे स्टेशन आहे. येथे संपूर्ण वर्षभर भक्त भाविकांची गर्दी असते.
शिवपूर्वकाळापासून वैभवसंपन्न असलेले कारंजे हे नृसिंह सरस्वतींचे जन्मस्थान असल्याचे वासुदेवानंद सरस्वतींनी शोधून काढले आहे. येथील काळे आडनावाच्या घराण्यात नृसिंह सरस्वतींचा जन्म झाला. त्यांच्या बंधूंची वंश-परंपरा अद्याप नांदती आहे. या वंशाच्या शाखा काशी आणि नागपूर या ठिकाणी आहेत.
जर इतिहास जाणून घेतला आपण तर वाकाटकपूर्व राजवटीपासून तो देवगिरीचे यादव, मोगल, निजामशाही, ईमादशाही, नागपूरकर भोसले अशा अनेक राजवटी या नगरीने अनुभवल्या आहेत. या साम्राज्यांत उभारलेल्या दिल्ली वेस, दारव्हा वेस, मंगरूळ वेस आणि पोहा वेस या चार भग्नावस्थेतील वेशी आजही कारंजा लाड या गावात आहेत.
अहमदनगरच्या बादशहाच्या मुलीला स्त्रीधन म्हणून कारंजा गाव आंदण म्हणून दिले होते असे म्हणतात. त्यामुळे या गावाचा उल्लेख जुन्या कागदपत्रात बिबीचे कारंजे असाही होतो. आतापर्यंत किल्ला म्हणून ओळखली जाणारी एक गढी आत्ता आत्तापर्यंत अस्तित्वात होती. तिथे आता बिबीसाहेब दर्गा आहे. त्याचा दरवर्षी उरूस निघतो. या लगतचा भागाला बिबीसाहेबपुरा असे म्हणतात. नगरपालिकेची इमारत म्हणजे प्राचीन हमामखाना आणि पोलीस ठाण्याची इमारत म्हणजे हत्तीखाना असल्याचे सांगितले जाते. अशा या नगरीने अलोट ऐश्वर्यसंपन्नता अनुभवली आहे. याची साक्ष म्हणून कस्तुरीच्या हवेलीचा उल्लेख केला आहे. उंटावरून कस्तुरी विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या व्यापाऱ्याकडून सर्व कस्तुरी खरेदी करून हवेलीच्या बांधकामात तिचा वापर करणाऱ्या व त्या मोबदल्यात अकबरकालीन नाणी देणाऱ्या लेकुर संघई यांची ही कथा पिढ्यान्पिढ्या सांगितली जाते. या संघईची एकोणिसावी पिढी आज कारंज्यात आहे. मात्र या हवेलीची प्रचंड दुर्दशा झाली आहे. अशा प्राचीन हवेल्यातील भिंतीतून जाणारे जिने, तळघरे, बाराद्वारी नावाची विहीर आणि त्यातील भुयारी वाटा मात्र अजून शिल्लक आहेत. कारंजा गाव हे पूर्वी धनाढ्य होते. या गावात शिवाजी महाराजांचे वास्तव होते. असे जुने इतिहास सांगतो. हे शहर इ.स.च्या १४व्या शतकातील हिंदू गुरू नृसिंह सरस्वतींचे जन्मस्थान म्हणून ओळखले जाते
नृसिंह सरस्वतींचे जन्मस्थान असलेला काळ्यांचा वाडा सुमारे साठ वर्षीपूर्वी काशीच्या काळ्यांचे मुनीम असलेल्या घुडे नावाच्या गृहस्थांना विकल्या गेली आहे. काशी येथील पंचगंगेश्वरमठाधिपती ब्रह्मानंद सरस्वती ऊर्फ लीलादत्त यांनी या वाड्यासमोरची मोकळी जागा मिळवून आणि तेथें मंदिर उभारून त्यांत चैत्र वद्य प्रतिपदा, शा.श. १८५६ या दिवशी नृसिंह सरस्वतींच्या पादुकांची स्थापना केली आणि पूजेअर्चनेची शाश्वत व्यवस्थाही केली आहे.