भारतीय जनता पक्षाची गौरवशाली वाटचाल !
भारतीय जनता पक्ष हा देशातील सर्वात मोठा पक्ष म्हणून ओळखला जातो. देशाच्या जडणघडणीत भाजपचे मोठे योगदान आहे. भाजप विचारधारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी प्रेरित आहे. केंद्रात सध्या भारतीय जनता पक्षाचे सरकार असून, कणखर पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत.
* तत्कालीन जनसंघ
समस्त भारतीयांचे हित जपण्याच्या दृष्टिकोनातून १९५१ साली श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी जनसंघाची स्थापना केली. जनसंघाच्या स्थापनेनंतर जम्मू-काश्मीरला भारतामध्ये संपूर्णतः समाविष्ट करून घेण्यात यावे, अशी जनसंघाची मागणी होती. त्यासाठी अनेक आंदोलने झाली. यादरम्यान श्यामाप्रसाद मुखर्जी यांना अटक झाली आणि तुरुंगात असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर पंडित दीनदयाल उपाध्याय व त्यानंतर अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी यांनी जनसंघाची सूत्रे आपल्या हाती घेतली.
* आणीबाणीस तीव्र विरोध
१९७५ साली श्रीमती इंदिरा गांधी पंतप्रधान असतांना त्यांनी देशभरात आणीबाणी लागू केली. यालाही जनसंघाने प्रचंड विरोध दर्शवत निदर्शने केली. यादरम्यान जनसंघाच्या अनेक नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आले. १९७७ साली आणीबाणी उठल्यानंतर जनसंघाने भारतीय लोकदल, काँग्रेस (ओ) स्पेशालिस्ट पार्टी इत्यादी पक्षांसोबत एकत्र येऊन ‘जनता पक्ष’ स्थापन केला. आणीबाणीमुळे इंदिरा गांधींबद्दल जनतेच्या मनात संताप आणि निराशा होतीच, जी १९७७ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये दिसून आली. परिणामी जनतेने काँग्रेसकडे पाठ फिरवली आणि जनता पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच जनता पार्टीच्या रूपातून देशाला बिगर काँग्रेसी सरकार लाभले. देशाच्या पंतप्रधानपदी मोरारजी देसाई तर परराष्ट्रमंत्री पदावर अटलबिहारी वाजपेयी विराजमान झाले.
* भारतीय जनता पक्ष
काही काळानंतर जनता पक्षामध्ये अंतर्गत कलह निर्माण झाला. त्यातून ‘भारतीय जनता पक्ष’ निर्माण झाला. लालकृष्ण अडवाणी यांच्या शिष्टमंडळाने कमळ चिन्हावर दावा केला आणि हे चिन्ह भाजपला मिळाले. अटलबिहारी वाजपेयी हे भाजपचे पहिले अध्यक्ष बनले. स्थापनेनंतर भाजपचे पहिले अधिवेशन मुंबई येथे पार पडले. यावेळी अध्यक्षीय भाषणात अटलबिहारी वाजपेयी म्हणाले होते, अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा…! आज भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे. भाजपने देशाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मागील १० वर्षांमध्ये प्रचंड मेहनत घेतली. भारताने आज जागतिक पातळीवर विकासाच्या दृष्टीने नावलौकिक मिळविले आहे. भारताला जागतिक उंचीवर नेण्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. राष्ट्रवाद, एकात्मता, लोकशाही, समाजवाद आणि सर्वधर्म समभाव या मूल्यांसह देशाच्या विकासासाठी भाजप सदैव कटिबद्ध आहे आणि पुढेही राहील.