उद्योगी महिलांच्या पंखांना बळ देणारी अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना
देशाच्या विकासात महिलाशक्तीचे स्थान अनन्यसाधारण आहे. स्वतःचे कुटुंब अगदी व्यवस्थितरीत्या सांभाळणारी महिला उद्योग – व्यवसाय क्षेत्रातही स्वकर्तृत्वाच्या बळावर उत्तुंग झेप घेताना दिसते. महिलांच्या या उद्योग कौशल्याला आर्थिक बळ देणारी योजना नुकतीच महाराष्ट्र सरकारने जाहीर केली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेअंतर्गत आता महिलांनाही स्वतःच्या उद्योग उभारणीसाठी, विस्तारासाठी भक्कम अर्थसाह्य दिले जाणार आहे.
महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री मा. श्री. अजित पवार साहेब यांनी राज्याच्या २०२४ च्या अर्थसंकल्पात `अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजने’ची घोषणा केली. महिलांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या स्टार्टअप्सना निधी उपलब्ध करून देण्याचा या योजनेचा उद्देश आहे. ज्यामुळे त्यांच्या व्यवसायाला चालना मिळेल. महिलांच्या नेतृत्वात असणाऱ्या नवीन स्टार्टअपला त्यांच्या आवश्यकतेनुसार आर्थिक साह्य मिळू शकते. यामुळे त्यांच्या व्यवसायात वाढ होण्यास मदत होईल आणि त्याचबरोबर अन्य महिलांनादेखील रोजगार उपलब्ध होईल. या योजनेमुळे महिलांच्या स्टार्टअप्सना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आणि स्वतंत्र होण्यास मदत मिळते. ‘महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटी’ या संस्थेमार्फत या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन महिला उद्योजकांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या स्टार्टअप्सना आर्थिक मदत प्रदान करेल. म्हणजेच सर्व स्टार्टअप महिला उद्योजकांना १ लाख ते २५ लाख रुपयांपर्यंत आर्थिक साहाय्य उपलब्ध करून देईल.
योजनेसाठी पात्रतेच्या अटी :
– या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांच्या नेतृत्वात असणाऱ्या स्टार्टअपची वार्षिक उलाढाल १० लाख रुपयांपेक्षा कमी असू नये.
– लाभार्थी महिलेची कंपनी किंवा स्टार्टअपमध्ये किमान ५१ टक्के भागीदारी असणे आवश्यक आहे.
– स्टार्टअप किमान १ वर्षांपासून कार्यरत असावे.
– स्टार्टअपसाठी याआधी शासनाच्या कोणत्याही योजनेमार्फत लाभ घेतलेला नसावा.
– लाभार्थी महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असायला हवी.
– स्टार्टअपची DPIIT आणि MCA मध्ये नोंदणी केलेली असावी.
– महिला संचालित स्टार्टअपची नोंदणी महाराष्ट्रात झालेली असावी.
कोणती कागदपत्रे आवश्यक?
– पिच डेक
– MCA प्रमाणपत्र
– DPIIT प्रमाणपत्र.
– कंपनीचा लोगो.
– संस्थापकाचा फोटो.
– सेवा / उत्पादनांचा फोटो.
अर्ज कसा करावा?
– या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतो.
– महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटीच्या अधिकृत वेबसाईटवर योजनेचा ऑनलाइन अर्ज उपलब्ध आहे.
– अर्ज केल्यानंतर अर्जाची पडताळणी विभागाच्या अधिकाऱ्याकडून केली जाईल.
– निवडलेल्या स्टार्टअप्सना नंतर संपूर्ण मूल्यांकनासाठी बोलावले जाईल.
– त्यानंतर त्यांच्या बँक खात्यात आर्थिक साह्य वितरित केले जाईल.
उद्योजक महिला भगिनींनो लक्षात घ्या, अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेअंतर्गत प्रस्ताव दाखल करण्याची अंतिम तारीख १४ ऑगस्ट २०२४ आहे. तेव्हा, लवकरात लवकर सगळी कागदपत्रे एकत्रित करून, या योजनेचा लाभ घेण्यासाठी सज्ज व्हा…! तुम्हाला तुमच्या उद्योग-व्यवसायात उत्तुंग यश लाभो, हीच सदिच्छा.