भारतीय मतदारांची पहिली पसंती राष्ट्रविकासाला समर्पित महायुती !
भारतीयांचे लाडके पंतप्रधान आणि देशाचे कणखर नेतृत्व मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या खंबीर नेतृत्वाखाली सलग तिसऱ्यांदा भाजप आणि मित्रपक्षांच्या महायुतीचे सरकार स्थानापन्न झाले आहे. जनकल्याणकारी मोदी कार्यकाळाची ही तिसरी टर्म आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये महायुतीच्या मतदानाचा टक्का वाढला आहे. विरोधी पक्ष मतदारांनी महायुतीला नाकारले, असा खोटा प्रचार करीत असला तरी, महायुती हीच मतदारांची पहिली पसंती ठरली आहे, हे एकूण मतदानाच्या आकडेवारीतून दिसते. लोकसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या मतांमध्ये फक्त दोन लाखांचे अंतर आहे. महायुतीला ४३.६० टक्के, तर महाविकास आघाडीला ४३.९१ टक्के मते मिळाली आहेत. ही आकडेवारी पाहिल्यावर भाजप आणि महायुतीला मतदारांनी नाकारले, हा प्रचार चुकीचा आहे.
* अफवा आणि भीतीचा बागुलबुवा
लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान कोणत्याही परिस्थितीत यावेळी भाजपला पराभूत करायचेच, त्यासाठी कोणत्याही थराला जायचे, अशा मन:स्थितीत विरोधक होते. समाजमाध्यमांच्या मदतीने मतदार विचलित होतील, मतदारांच्या मनात भीती निर्माण होईल, अशा पद्धतीच्या अफवा पसरविल्या गेल्या. मतदारांच्या मनात भीतीचा मोठा बागुलबुवा निर्माण करण्यात आला. नरेंद्र मोदींच्या विकासाच्या हमीसमोर आपला टिकाव लागणार नाही, हे लक्षात आल्याने पुन्हा भाजप सत्तेवर आल्यास संविधान बदलले जाणार, असा प्रचार काँग्रेस आणि इंडिया आघाडीतील पक्षांनी सुरू केला. अशा प्रचारामुळे जनता प्रक्षुब्ध होऊन समाजात दुही, असंतोष माजावा याच हेतूने या अपप्रचाराला गती दिली गेली. त्याच्या बरोबरीने धार्मिक आधारावर काही विशिष्ट समाजघटकांना भरघोस आश्वासने दिली गेली. धार्मिक आधारावर मतदारांचे ध्रुवीकरण करण्यासाठी अल्पसंख्याक समाजाच्या मनात भाजपबद्दल भय निर्माण करण्यात आले. त्याचा परिणाम विरोधकांना एकगठ्ठा मतदान मिळवण्यासाठी झाला. भाजप धोरणांविरुद्ध अपप्रचार करून मुस्लिमांच्या मनात भाजप आणि मोदी सरकारबद्दल भीती निर्माण केली गेली.
* अथक प्रयत्नांची पराकाष्ठा
लोकसभा निवडणुकीच्या काळात महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेश अध्यक्ष मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांनी पक्षासाठी जिवाचे रान केले. उपमुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीत ११५ प्रचार सभा घेतल्या. राज्याच्या कानाकोपऱ्यात जाऊन मतदारांपुढे पक्षाची भूमिका मांडत त्यांनी पक्षाचे समर्थपणे नेतृत्व केले. प्रदेश अध्यक्ष मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी लोकसभा निवडणुकीत संघटना स्तरावर १४७ बैठका घेतल्या. याशिवाय नमो संवाद, सुपर वॉरियर्स मेळावे यांसारख्या १०० हून अधिक बैठकांना मार्गदर्शन केले. त्यांनी ६९ जाहीर सभा घेतल्या. भाजपने संपूर्ण देशभरात जनमानस ढवळून टाकले होते.
* आत्मपरीक्षणाची घडी
प्रत्येक निवडणुकीतून भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व आणि संघटना काही ना काही शिकत गेली आहे. त्यामुळेच १९८४ च्या दोन जागांपासून पक्षाचा प्रवास २०१९ मध्ये म्हणजे ३५ वर्षांत ३०० च्या पलीकडे जाऊन पोहोचला होता. सलग तीन निवडणुकीत बहुमत मिळवणे ही भारतीय राजकारणात मोठी कामगिरी आहे. ज्या राज्यात पक्षाची कामगिरी अपेक्षेनुसार झालेली नाही तेथे धोरणात्मक, संघटनात्मक पातळीवर काही चुका होत्या का, याबाबत विचारमंथन सुरु आहे. ही आत्मपरीक्षणाची घडी आहे.