पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांचा जानेवारीत परीक्षा पे चर्चा कार्यक्रम
विद्यार्थी जीवनात परीक्षा हा अत्यंत महत्वाचा टप्पा प्रत्येकाला यशस्वीरीत्या पार करावाच लागतो. त्याचे कारण असे की, त्यावरच पुढच्या उज्ज्वल करिअरचे मार्ग दडलेले असतात. परीक्षेत उत्तुंग यश मिळाले, तरच आपल्याला हव्या त्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवता येतो. त्यामुळे परीक्षा, अभ्यास आणि परीक्षेची तयारी याबाबत मुलांमध्ये भीतीचे, दडपणाचे वातावरण असते. परीक्षेचा पहिला आणि महत्वाचा टप्पा असतो, तो म्हणजे शालांत परीक्षेचा म्हणजेच दहावीचा, त्यानंतर बारावीचा. कारण येथून पुढे महाविद्यालयीन जीवन आणि करिअरचे अनेक पर्याय खुले होतात. परीक्षेच्या काळात मुलांना आनंदी ठेवण्यासाठी, त्यांच्या मनावरचा ताण हलका करण्यासाठी पालक-शिक्षक आणि विद्यार्थी अशा तीनही घटकांनी आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. अशा वेळी मुलांना सांभाळून घेणे, त्यांचे मनोबल उंचावणे हे पालकांचे प्रथम कर्तव्य आहे. पालकांनी परीक्षेदरम्यान मुलांचे मनोबल कसे वाढेल, याकडे लक्ष द्यावे. त्याला कुठलाही ताणतणाव येणार नाही याची काळजी घ्यावी. सर्वच विद्यार्थ्यांना मेडिकल, आयआयटी यामध्ये प्रवेश मिळेलच असे नाही. या ठिकाणी जागा खूप मर्यादित असतात; स्पर्धा खूप मोठी असते. परंतु याव्यतिरिक्त इतर क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या भीतीने खचून जाऊ नये, अपयशाने निराश होऊ नये. संपूर्ण देशभरातील विद्यार्थ्यांची ही मनःस्थिती ओळखून आता देशाचे लाडके पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी हे जानेवारी – २०२५ मध्ये विद्यार्थ्यांशी याच विषयावर संवाद साधणार आहेत, परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात. या कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या टिप्सही देणार आहेत. जाणून घेऊया परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाविषयी.
परीक्षा पे चर्चा – २०२५
देशाचे लाडके पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या परीक्षा पे चर्चा- २०२५ या कार्यक्रमासाठी विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी विद्यार्थी १४ जानेवारी २०२५ पर्यंत अर्ज करू शकतात. सर्व स्पर्धकांना ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्याबद्दल प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे. या कार्यक्रमात नोंदणी करण्यासाठी विद्यार्थी आणि पालक innovateindia1.mygov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतात. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने आपल्या सर्व संलग्न शाळांसाठी परीक्षा पे चर्चा २०२५ संदर्भात अधिसूचना जारी केली आहे.
जानेवारीमध्ये होईल ‘परीक्षा पे चर्चा’
या कार्यक्रमासाठी ऑनलाईन MCQ स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. ही ऑनलाईन स्पर्धा १४ जानेवारी २०२५ रोजी संपणार असून सहावी ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसाठी ही स्पर्धा आहे. सर्व स्पर्धकांना ‘परीक्षा पे चर्चा’मध्ये सहभागी झाल्याबद्दलचे प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी नोंदणी करण्याची शेवटची तारीख १४ जानेवारी २०२५ आहे. ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाची ही आठवी आवृत्ती आहे, जी जानेवारी २०२५ मध्ये भारत मंडपम, नवी दिल्ली येथे होणार आहे. या मुख्य कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी निवड झालेल्या सुमारे २५०० विद्यार्थ्यांना शिक्षण मंत्रालयातर्फे पीपीसी किट देण्यात येणार आहेत. या कार्यक्रमात पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी हे पालक आणि शिक्षकांशी बोर्डाच्या परीक्षांबाबत चर्चा करतील आणि विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या टिप्सही देतील. परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाद्वारे महत्वपूर्ण परीक्षांच्या आधी विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण हलका करणे, हा हेतू आहे. याद्वारे त्यांना उज्ज्वल यशासाठी प्रेरणा मिळेल. या कार्यक्रमात सहभागी झालेले विद्यार्थी थेट पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांना प्रश्न विचारू शकतील.
नोंदणीसाठी अर्ज कसा करावा?
१) परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात नोंदणीसाठी innovateindia1.mygov.in अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
२) होम पेजवरील पार्टिसिपेट नाऊ या बटनावर क्लिक करा.
३) आता स्टुडंट्स पार्टिसिपेटवर क्लिक करा.
४) त्यानंतर आपले नाव आणि फोन नंबर प्रविष्ट करा आणि नोंदणी करा.
५) नावनोंदणीसाठी विद्यार्थी / पालक / शिक्षकांना आपले पूर्ण नाव, मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी नमूद करणे गरजेचे आहे.
ज्या विद्यार्थ्यांची या कार्यक्रमासाठी निवड होणार नाही, असे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक शिक्षण मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटवर तसेच सोशल मीडिया युट्यूब चॅनेलवर या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहू शकतील.