२२ जानेवारीला अयोध्या नगरीतील भव्यदिव्य मंदिरात येताहेत श्रीराम !
अयोध्या येथील श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. येत्या २२ जानेवारी २०२४ ला अयोध्येत प्रभू रामचंद्राच्या भव्य महालात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. श्रीराम सिंहासनावर विराजमान झाल्यानंतर लाखो रामभक्त अयोध्येत पोहचतील आणि दर्शन घेतील. या सोहळ्याची संपूर्ण व्यवस्था श्री राम मंदिर ट्रस्ट करत आहे.
अयोध्या येथील श्री राम मंदिर मागील किती तरी वर्षांपासून लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. रामभक्तांची अपार प्रतीक्षा, कठोर संघर्ष आणि अथक प्रयत्नानंतर आता हे भव्य राममंदिर पूर्णत्वास आले आहे. अयोध्येत श्रीराम मंदिर बांधण्याचे स्वप्न देशाचे मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी प्रत्यक्षात साकारले आहे. मंदिराचे बांधकाम आता पूर्ण झाले असून येत्या २२ जानेवारीला मंदिरात प्रभू श्रीराम विराजमान होतील. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी केवळ भारतवासीच नाही, तर जगभरातील रामभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण बघायला मिळत आहे. श्रीरामांना आपल्या स्थानावर विराजमान होताना बघण्यासाठी सर्वांचे डोळे आसुसलेले आहेत. हे भव्य राम मंदिर आणि तेथील परिसराची माहिती घेऊयात.
* अनेक तीर्थांचे जल व माती
श्री राम मंदिराची उभारणी ही शास्त्रोक्त पद्धतीनेच करण्यात आली असून, हे संपूर्ण मंदिर अवाढव्य आकाराच्या दगडांतून निर्माण झाले आहे. मंदिर उभारण्यासाठी देशभरातील २५८७ पवित्र ठिकाणांच्या मातीचा वापर करण्यात आला आहे. यमुनोत्री, हल्दीघाटी, केदारनाथ, बद्रीनाथ आणि गंगा यांसारख्या पवित्र ठिकाणांहून ही माती आणण्यात आली आहे. मंदिरासाठी नर्मदा, चंबळ, तापी, सतलज, नेपाळातून गंडक, इंद्रावती अशा एकूण १५० पवित्र नद्यांच्या जलाचा वापर केला गेला आहे. ज्यामध्ये ८ मोठ्या नद्या, ३ समुद्र आणि लंकेच्या १६ पवित्र ठिकाणचे जल, सोबतच मानसरोवरच्या जलाचाही वापर करण्यात आला आहे.
* मंदिराची अदभुत रचना
श्री राम मंदिराची अनेक वर्षांपासून सर्वांना प्रतीक्षा होती म्हणून या मंदिराची वास्तुरचना भव्य, सुंदर आणि सुरेख असावी यावर विशेष लक्ष देण्यात आले आहे. यासाठी प्रचंड प्रमाणात खर्च करण्यात आलेला आहे. राम मंदिर बनविण्याचा संपूर्ण खर्च जवळपास १८०० कोटी इतका आहे. या मंदिराला १००० वर्षांपर्यंत दुरुस्तीची गरज पडणार नाही, अशा पद्धतीने ते उभारण्यात आले आहे. मंदिराची उंची ३६० फूट आणि रुंदी २३५ फूट ठेवण्यात आली आहे. या मंदिराचा एकूण परिसर २८००० स्क्वेअर फूट इतका आहे. नागर शैलीत बनणाऱ्या या मंदिराला इतके मजबूत बनविण्यात आले आहे की ६.५ मॅग्निट्युडचा भूकंपसुद्धा याला काहीही हानी पोहचवू शकणार नाही.
* रत्नजडित सुमेरू पर्वत
भगवान श्रीरामांना विराजमान होण्यासाठी नवरत्नांचा सुमेरू पर्वत बनविण्यात आला आहे. हा पर्वत काशीतील कामगारांद्वारे तयार करण्यात आलेला असून, यावर श्रीरामांची धनुर्धारी स्वरूपातील मूर्ती असेल. हिरे, माणिक, पाचू, नीलम, मोती, पुखराज, पोवळा, गोमेद या बहुमूल्य रत्नांपासून हा सुमेरू पर्वत तयार करण्यात आला आहे. सोने आणि २ कॅरेटपेक्षा जास्त शुद्धतेचा हिरादेखील यामध्ये जडलेला आहे.
* श्रीरामाचे आजोळ आणि सासुरवाडी
या भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी श्रीरामाचे आजोळ छत्तीसगढमधून ३ हजार क्विंटल तांदूळ आणण्यात आले आहेत. या तांदळापासून बनविलेल्या पदार्थाचा पहिला घास श्रीरामांना भरविला जाईल. तसेच त्यांची सासुरवाडी नेपाळमधून मिठाई आणि आभूषणांनी सजलेल्या ११०० थाळ्या येणार आहेत.
* विशाल घंटा व प्राणप्रतिष्ठेसाठी जल
अयोध्या येथील राम मंदिरासाठी तामिळनाडूतून १२० किलो वजनाची घंटा या मंदिरात लावण्यात येणार आहे. तसेच एटा जिल्ह्यातून अष्टधातूपासून निर्मित २१ किलो वजनाची घंटासुद्धा आणण्यात आलेली आहे.
* भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा
अयोध्या येथील मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यापूर्वी श्रीरामांच्या मूर्तीवर डोळ्यांना पट्टी बांधण्यात आलेली असेल. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी मूर्तीच्या पाठीमागे जाऊन मूर्तीच्या डोळ्यावर असलेली पट्टी काढतील. त्याचवेळी समोर एक व्यक्ती आरसा घेऊन उभा असेल, जेव्हा रामलल्लाच्या डोळ्यावरून पट्टी काढली जाईल तेव्हा त्यांची दृष्टी थेट या सुंदर आरशावर पडेल.
* संत-महंतांची मंदिरे
भगवान श्रीराम यांचे चरित्र अगाध आहे. रामायण या प्राचीन ग्रंथात त्याविषयीचे अनेक प्रसंग आले आहेत. रामायणातील काही पात्रेदेखील अत्यंत महत्वाची आहेत म्हणून श्रीराम मंदिर परिसरात महर्षी वाल्मिकी, महर्षी वसिष्ठ, महर्षी विश्वामित्रा, महर्षी अगस्त्य, निषाद राज आणि शबरी माता यांचीही मंदिरे उभारण्यात आलेली आहेत.
* राम मंदिर परिसरातील सुविधा
श्रीराम मंदिराच्या वास्तू आणि सुंदरतेवर जितके लक्ष दिले गेले आहे तेवढेच लक्ष मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांच्या सुविधेकडेही देण्यात आले आहे. मंदिर परिसरात भूमिगत पाणी साठवले जाणार असून अग्निशमन दल, पाणी, स्वच्छतागृहे, रुग्णालय व पादत्राणे आणि मोबाईल फोन ठेवण्यासाठी स्वतंत्र संकुलदेखील आहे. भगवान श्रीराम यांचे दर्शन करतेवेळी भाविकांना कसलाही त्रास होऊ नये याची पूर्ण सोय केलेली आहे.
अशा प्रकारे सर्व सुविधा आणि मनमोहक कलाकृतींनी सुसज्ज असलेल्या मंदिरात येत्या २२ जानेवारीला भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम विराजमान होणार आहेत.