दिवाळी, हा प्रकाशाचा, आनंदाचा आणि मांगल्याचा उत्सव. दिव्यांच्या रोषणाईने आसमंत उजळून निघतो आणि प्रत्येक घरात उत्साहाचे, गोडव्याचे वातावरण असते. दिवाळी म्हणजे ‘देण्याचा’ आणि ‘जोडण्याचा’ सण.
या प्रकाशाच्या उत्सवात आपल्या आजूबाजूला असलेल्या गरजू व्यक्तींना विसरू नका. जुने कपडे, पुस्तके, धान्य किंवा फराळ अशा वस्तू गरजू कुटुंबांना दान करा. तुमच्या मदतीने त्यांच्याही घरात आनंदाचा दिवा लागेल. हातमागावरचे कपडे, मातीचे दिवे, हाताने बनवलेल्या भेटवस्तू स्थानिक कारागीर किंवा बचत गटांकडून खरेदी करा. यामुळे त्यांच्या जीवनमानात सुधारणा होण्यास मदत होईल.
भारताचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या आवाहनानुसार आपण स्वदेशी वस्तू वापरण्याच्या संकल्प यातून पूर्ण करू शकतो.
विजेच्या दिव्यांच्या माळांऐवजी मातीच्या पणत्या लावा. यामुळे आपल्या पारंपरिक काम करणाऱ्या कारागिरांना मदत मिळेल आणि ऊर्जाही वाचेल. थर्मोकोल, प्लास्टिकऐवजी कागद, कापड, नैसर्गिक फुले आणि पानांचा वापर करून घर सजवा. फटाके टाळा किंवा फक्त कमी आवाजाचे, पर्यावरणपूरक फटाके वापरा. शांत आणि स्वच्छ दिवाळीचा अनुभव घ्यावा.
शक्य असल्यास, वृद्धाश्रम, अनाथाश्रम किंवा इतर सामाजिक संस्थांना भेट देऊन त्यांच्यासोबत थोडा वेळ घालवा किंवा आर्थिक मदत करा. कामाच्या धावपळीत भेटता न आलेल्या नातेवाईक आणि मित्रांना आवर्जून भेटा. गोड फराळ वाटून स्नेहबंध अधिक दृढ करा.
आपल्या सोसायटीतील, चाळीतील सर्व रहिवाशांना एकत्र आणून सार्वजनिक ठिकाणी दिवे लावा, रांगोळ्या काढा. यामुळे सामुदायिक एकोपा वाढेल. कारण, दिवाळी कुटुंबाला आणि समाजाला एकत्र आणत असते. जुने हेवेदावे विसरून जा. दिवाळीच्या निमित्ताने नव्याने सुरुवात करा आणि प्रेम, आपुलकीचा संदेश सर्वत्र पसरावा.
या दिवाळीला, आपण केवळ आपल्या घराला नाही, तर आपल्या पर्यावरणाला आणि समाजालाही उजळून टाकूया. ‘उत्सव’ आणि ‘उत्तरदायित्व’ यांचा सुंदर समन्वय साधून, एक पर्यावरण पूरक, सामाजिक जाणीव जपणारी आणि एकोप्याची दिवाळी साजरी करूया.
तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा ! ही दिवाळी तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि शांती घेऊन येवो !